प्रयागराज (उत्तर प्रदेश) : अतिक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करणारे तीन शूटर्स अरुण मौर्य, सनी सिंग आणि लवलेश तिवारी यांना आज प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन शटर्सना पोलीस व्हॅनमधून न्यायालयात आणण्यात आले, तर एकाला रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. पोलिसांनी न्यायालयाबाहेरच माध्यमांना रोखले. या तिघांवरही न्यायालयात खटला चालू आहे.
तिघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी : काल रात्री उशिरा प्रयागराजच्या कॅल्विन हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी आणलेल्या माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची या तीन तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली. खून केल्यानंतर तिघांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. पोलिसांनी या तीन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेले. चौकशीत त्यांची नावे लवलेश तिवारी, सनी सिंग आणि अरुण मौर्य असे असल्याचे समोर आले. या तिघांनीही आपल्याला डॉन व्हायचे होते, म्हणून ही घटना घडवून आणल्याची कबुली दिली आहे. पोलीस रात्री उशिरापर्यंत या तिघांचीही विविध मुद्यांवर चौकशी करत होते.