नवी दिल्ली - मुंबई 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणा सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. लॉस एंजेलिसमधील फेडरल न्यायाधीशांनी प्रत्यार्पणाच्या प्रकरणात वकिलांना 15 जुलैपर्यंत अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तहव्वुर राणा यांना भारताकडे कधी सोपवण्यात येणार हे अद्याप स्पष्ट नाही. तोपर्यंत राणा अमेरिकेच्या कोठडीत राहणार आहे. भारत सरकारच्या विनंतीनुसार, तहव्वुर राणा यांची प्रत्यर्पण सुनावणी लॉस एंजेलिस येथील दंडाधिकारी न्यायाधीश जॅकलिन चुलजियान यांच्या न्यायालयात पार पडली.
भारत आणि अमेरिकादरम्यान झालेल्या प्रत्यार्पण कराराच्या अनुषंगाने 59 वर्षीय राणाचे प्रत्यार्पण प्रकिया पार पडत आहे. भारत सरकारने राणा यांच्या औपचारिक प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर अमेरिकेने प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. हेडलीच्या दहशतवादी कटाबद्दल तहव्वुर राणा यांना माहिती नव्हती. ते फक्त बालपणीच्या मित्राची मदत करण्याचा प्रयत्न करीत होते. हेडली हा खोटारडा असून गुन्हेगारी प्रकरणात त्याने अमेरिकन सरकारला अनेकदा फसवले आहे. त्याची साक्ष विश्वासार्ह मानली जाऊ नये, असा युक्तीवाद तहव्वुर राणा यांनी केला.