लखनौ- अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज जिल्ह्यात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मठामधील लोकांची चौकशी सुरू आहे.
प्रयागराजमधील बाघंबरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार महंतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. महंत यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. महंतांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस मठामधील लोकांची चौकशी करत आहेत.
हेही वाचा-उमा भारती बरळल्या, म्हणाल्या नोकरशाहीची काही औकात नाही, नेत्यांची चप्पल उचलते
राम मंदिर आंदोलनात सक्रिय भूमिका पार पाडणारे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी महंत गिरी यांचा मृत्यू हा कट असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा-२०२२ ला गोव्यात भाजपला मिळणार ऐतिहासिक विजय, फडणवीसांचा दावा
अखिलेश यादव यांनी व्यक्त केला शोक-
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. हा मृत्यू म्हणजे कधीही न भरून निघणारी हानी असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. याबाबत अखिलेश यादव यांनी ट्विटही केले आहे.
दरम्यान, महंत नरेंद्र गिरी हे जून 2021 मध्ये एका गंभीर वाहन अपघातामधून वाचले होते. हा अपघात एका स्कूट चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला होता. महंत गिरी यांनी लव्ह जिहाद विरोधात कठोर कारवाई करण्याची व लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी उत्तर प्रदेश सरकारकडे लावून धरली होती. महाराष्ट्रातील पालघर साधू हत्याकांडानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करणारे निवदेन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिले होते.
हेही वाचा-राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी