रायपूर (छत्तीसगड) :नवा रायपूर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा म्हणाले की, 'पंजाब नेहमीच देशाचा कोहिनूर राहिला आहे. हे राज्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पंजाबमध्ये पंजाबी सतत समस्यांचा सामना करत आहेत. आता पंजाब रिकव्हरीच्या दिशेने वाटचाल करत होता, दरम्यान, हे सर्व पुन्हा सुरू झाले आहे. अजनाल्यात परिस्थिती बदलली आहे. हा भाग अमृतसर सीमेवर आहे. बीएसएफने येथे आपली उपस्थिती वाढवली आहे.
'असे 75 वर्षांत पाहिले नाही' : प्रताप सिंह बाजवा पुढे म्हणाले की, 'अमृतपाल सिंहच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा साथीदार तुफान सिंह याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर अमृतसिंहने मी त्याला सोडवण्यास येतो आहे, अशी चेतावणी दिली होती. त्याने त्याच्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी अजनाल्याच्या पोलीस ठाण्यावर हल्ला केला. मी असे ७५ वर्षात कधीच पाहिलं नाही. या आधीही वाईट काळ होता पण त्या काळातही असं कधी झालं नाही.
'राज्यातील जनतेचे रक्षण कोण करणार?' :या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांच्या मौनाबाबत बाजवा म्हणाले की, जर मुख्यमंत्री भगवंत मान यांना वाटत असेल की गप्प राहून काही होईल तर तसे काहीही होणार नाही. पंजाबची जनता हे सहन करणार नाही. राज्यातील जनतेचे रक्षण कोण करणार? या बाहेरच्या लोकांशी लढण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. या लोकांनी गुरू ग्रंथ साहिबचे रूपही सोबत घेतले आहे, असे भाजपने म्हटले आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे.'
'भगवंत मान आणि भाजपला शांतता बिघडवायची आहे' : ते पुढे म्हणाले की, 'या घटनेवर शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीची जबाबदारीही निश्चित व्हायला हवी. अमृतपाल जेव्हा गुरू ग्रंथ साहिब घेऊन पोलिस स्टेशनला जात होता तेव्हा त्याला विरोध व्हायला हवा होता. ग्रंथ साहिब अशा गैरकृत्यांमध्ये ढाल बनू नये. भगवंत मान आणि भाजपला पंजाबची शांतता बिघडवायची आहे. मात्र आम्ही हे कधीही होऊ देणार नाही.'