अजमेर : राजस्थानच्या अजमेरमधील परबतपुरा बायपासवर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बायपासवरून जाणारे दोन ट्रेलरची समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही ट्रेलर्स पेटले. यावेळी आगीत होरपळून ट्रेलरमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक 15 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जेएलएन रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळावरून चौघांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह जेएलएन रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौघे मृत ट्रेलरचे चालक आणि क्लिनर असावे असा अंदाज अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीताराम प्रजापत यांनी व्यक्त केला. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले. उर्वरीत दोघांची ओळख अद्याप पटली नसल्याचे त्यांनी सांगितले.