हैदराबाद Air Ticket Price Hiked : दरवर्षी दिवाळीत विमान, बसेसच्या तिकिटांचे दर वाढतात. मात्र, यंदा विमान भाडेवाढ दुपटीपेक्षाही अधिक वाढवण्यात आली आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये दिवाळी, नाताळ यामुळं मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आल्या आहेत. यामुळं घरी येणारे तसंच बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. लवकर आणि आरामदायी प्रवासाचं साधन म्हणून अनेकजण विमान प्रवासाला पसंती देतात. याचाच फायदा घेत विमान कंपन्यांनी ऐन सणासुदीत तिकिटांचे दर वाढवले आहेत. त्यामुळं विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
मोठ्या प्रमाणात भाडेवाढ : दिवाळी कालावधीत राज्यात मुंबई-नागपूर व पुणे-नागपूर सर्वाधिक महागडा विमान प्रवास ठरण्याची शक्यता आहे. मुंबई-नागपूर प्रवासाचं 9 नोव्हेंबरचं तिकीट 10 हजार 800 रुपये आहे. मात्र शुक्रवार, १० नोव्हेंबर व शनिवार, ११ नोव्हेंबरच्या तिकीटांसाठी प्रवाशांना तब्बल 14 हजार 750 व 15 हजार 200 रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडं पुणे-नागपूर विमानाचं तिकीटही 8 व 9 नोव्हेंबरला 12 ते 14 हजार रुपयांदरम्यान आहे. मात्र 10 नोव्हेंबरला याच प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल 16 हजार 300 रुपये मोजावे लागणार आहेत.