नवी दिल्ली - कोणी जर हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा; त्या त्याच्या मूळ स्वभावातच असते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेविषयी काय सांगाल?, असा सवाल त्यांनी मोहन भागवत यांना केला. तसेच काही इतर प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
असदुद्दीन ओवेसी यांनी टि्वट करत मोहन भागवत यांना काही प्रश्न केले आहेत. गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेविषयी काय सांगाल. नेल्ली हत्याकांड, 1984 शीख विरोधी दंगल आणि 2002 गुजरात दंगली या सर्वांना जबाबदार असलेल्या लोकांबद्दल काय सांगाल. बहुतेक भारतीय विश्वास न ठेवता देशभक्त आहेत, असं समजणं तर्कसंगत आहे. हे आरएसएसच्या अज्ञानी विचारधारा प्रदर्शीत करतं, असे ओवेसी म्हणाले.
एका विशेष धर्माच्या लोकांना आपोआप देशभक्तीच प्रमाणपत्र मिळतं. तर दुसरीकडे अन्य धर्माच्या लोकांना आपण देशभक्त आहोत आणि त्यांनाही इथे राहण्याचा अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च कराव लागतं, असेही ओवेसी म्हणाले.
काय म्हणाले मोहन भागवत ?
महात्मा गांधी यांच्या जीवनावर लिहलेले 'मेकिंग ऑफ ए हिंदू पैट्रियट' या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला मोहन भागवत यांनी संबोधीत केलं. कोणताही हिंदू, भारत द्रोही किंवा भारत विरोधी होऊ शकत नाही. तसेच देशभक्तीची प्रवृत्ती प्रत्येकांमध्ये असते. भारतातील नागरिक या भूमिला आपली मानतात. या मातीची कोणत्या कोणत्या रुपाने पूजा केली जाते. मात्र, गांधीजींनी माझी देशभक्ती माझ्या धर्मातून स्पष्ट होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोणताही हिंदू देशविरोधी नसतो; जो हिंदू आहे तो देशभक्त असायलाच हवा, फक्त त्याच्या निद्रीस्त देशभक्तीला जागृत करणे गरजेचे आहे, असे मोहन भागवत म्हणाले होते.