नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटले आहे की, '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एखादा विशिष्ट चेहरा उभा केला तर त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो.' (Asaduddin Owaisi on opposition face). एएनआयशी विशेष संभाषणात ओवेसी म्हणाले की, भाजपला पराभूत करण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विरोधकांना एकत्र येणे आवश्यक आहे. ओवेसी म्हणाले, 'विरोधकांनी सर्व 540 लोकसभा मतदारसंघात भाजपला कडवी झुंज द्यावी. विरोधकांचा एक चेहरा भाजपविरोधात लढला तर त्याचा फायदा दुसऱ्याला होईल. मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल किंवा राहुल गांधी असा सामना रंगला तर त्याचा फायदा पंतप्रधानांना होईल.
2019 मध्ये देखील महाआघाडीची स्थापना : 2019 मध्ये मोदी सरकार हटवण्यासाठी विरोधकांनी महाआघाडी स्थापन केली होती. मात्र, युती आपल्या उद्दिष्टात यशस्वी न झाल्याने अखेर युती तुटली. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून, AAP ने अलीकडेच दावा केला आहे की 2024 ची लढत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होईल.
चंद्रशेखर राव यांची देखील महत्वकांक्षा : केजरीवाल यांची वाढती लोकप्रियता, राष्ट्रीय राजधानीतील त्यांचे विकासाचे मॉडेल आणि देशातील आपचा वाढता प्रभाव यामुळे भाजप आणि पंतप्रधान हादरले असल्याचा दावा आप पक्षाने केला आहे. केजरीवाल व्यतिरिक्त, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) केले आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविली.
ममता बॅनर्जीं बाबत खात्री नाही : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान मोदींविरोधात उभे करायचे आहे का, असे विचारले असता, एआयएमआयएमचे प्रमुख म्हणाले, 'ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक घेतली. त्यामुळे त्या पंतप्रधान मोदींविरोधातील विरोधकांचा चेहरा असाव्या की नाही याची खात्री नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सर्व विरोधी शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचे आणि 2024 मध्ये भाजपच्या विरोधात एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले होते. एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, 'मुख्यमंत्री बॅनर्जी संसदेत भाजपविरोधात ठराव मांडतात, पण नंतर पंतप्रधान मोदींची प्रशंसा करतात'.