चेन्नई AIADMK Exits NDA : AIADMK ने सोमवारी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबतची युती तोडण्याची घोषणा केली. पक्षाने म्हटले आहे की, भाजपाच्या हल्ले आणि एआयएडीएमके आणि त्यांच्या नेत्यांवर एक वर्षाहून अधिक काळ केलेल्या बदनामीकारक विधानांचा निषेध आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. एआयएडीएमकेचे उप संयोजक केपी मुनुसामी म्हणाले, "एआयएडीएमकेने बैठकीत एकमताने ठराव मंजूर केला. ठरावानुसार, पक्ष आजपासून भाजपा आणि एनडीएसोबतचे सर्व संबंध तोडत आहे. भाजपाचे प्रदेश नेते आमच्या माजी नेत्यांबद्दल काहीही बोलत आहेत. आमचे सरचिटणीस ईपीएस आणि आमच्या केडरबद्दल अनावश्यक टिप्पणी करत आहेत.
एनडीएशी फारकत घेण्याचा निर्णय : "एनडीएशी फारकत घेण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख एडप्पाडी के पलानीसामी यांच्या अध्यक्षतेखाली एआयएडीएमके मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांना सांगण्यात आले की, पक्षाने सर्वानुमते एनडीएशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएडीएमके 2024 च्या निवडणुका समविचारी पक्षांच्या सहकार्याने लढवणार आहे. यासंदर्भातील ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याचे मुनुसामी यांनी सांगितले. "भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई गेल्या एक वर्षापासून आमचे माजी नेते, आमचे सरचिटणीस ईपीएस आणि आमच्या कार्यकर्त्यांवर सतत अनावश्यक टीका करत आहेत. आजच्या बैठकीत हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला," असे एआयडीएमके नेत्यांनी सांगितले.