अहमदाबाद : गुजरात दंगलीप्रकरणी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ( SIT ) धक्कादायक खुलासा केला आहे. सुनियोजित पद्धतीने गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपास पथकाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामागे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल ( Ahmed Patel ) यांचा हात होता. त्याच्या सांगण्यावरून संपूर्ण कट रचला गेला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, भाजपने म्हटले आहे की, गुजरात दंगलीच्या मागे कोणाचे षडयंत्र होते हे एसआयटीने दाखल केलेल्या शपथपत्राने सर्वांसमोर आले आहे.
गुजरात पोलिसांनीशुक्रवारी कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जाला विरोध केला आणि म्हटले की त्या राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार पाडण्याच्या मोठ्या कटात सहभागी होत्या. गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सत्र न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा करण्यात आला आहे की, 2002 च्या दंगलीनंतर राज्यातील भाजप सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून सेटलवाड यांनी मोठा कट रचला होता.
नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी -एसआयटीने दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्राने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एसआयटीने प्रतिज्ञापत्रात खुलासा केला आहे की,नरेंद्र मोदींना फसवण्यासाठी अहमद पटेल यांच्याकडून तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार, संजीव भट्ट यांना निधी मिळाला होता. या सर्व प्रकरणात एसआयटीकडे ठोस पुरावेही आहेत.