नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांवर प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी तसेच केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले, होते की, जर राहुल विरोधी पक्षनेते झाले तर पंतप्रधान मोदींना कोणीही हरवू शकणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने वरील प्रतिउत्तर दिले आहे.
पंतप्रधान त्यांच्यावर खूश होतील : ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून बोलत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसची प्रतिमा डागाळण्यासाठी पंतप्रधान आणि ममता यांच्यात डील सुरू आहे. ममता बॅनर्जी यांना तपास यंत्रणांच्या छाप्यांपासून स्वत:चा बचाव करायचा आहे. यामुळेच त्या काँग्रेसच्या विरोधात असे बोलत आहेत. कारण असे बोलल्यावर पंतप्रधान त्यांच्यावर खूश होतील असही ते म्हणाले आहेत.
त्यांच्यामध्ये करार असल्याचे सिद्ध केले : अधीर रंजन म्हणाले की, भाजपचा उद्देश काँग्रेस आणि राहुल गांधींना संपवणे हा आहे. त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी आता ममता बॅनर्जी यांचा इरादाही बदलला आहे. त्यांना ईडी-सीबीआयला टाळायचे आहे. सध्या काँग्रेसला जो विरोध करेल त्याच्यावर भाजप खुश असेल. आणि ममता बॅनर्जीही आता याच कामात गुंतल्या आहेत. अधीर रंजन म्हणाले की, ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून अशी विधाने करत आहेत. ममतांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यामध्ये करार असल्याचे सिद्ध केले आहे.
मोदी विरुद्ध राहुल गांधी असा मुद्दा व्हावा : ममता बॅनर्जी आपल्या भाषणात म्हणाल्या होत्या की, भाजप राहुल यांच्या विधानांना जास्त महत्व देते. भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपने त्यांच्या दाढी आणि टी-शर्टवरही भाष्य केले होते. तो वादाचा मुद्दा बनला होता. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा मुद्दा व्हावा, अशी भाजपची इच्छा आहे. आणि जर असे झाले तर यामध्ये मोदी विजयी होतील असही त्या म्हणाल्या आहेत. त्यावर काँग्रेसने वरील खरमरीत उत्तर काँग्रेसने दिले आहे.
हेही वाचा :लिव्ह-इन रिलेशनशिपबाबतची याचिका फेटाळली, ही एक मूर्ख कल्पना असल्याची कोर्टाची टिप्पणी