नवी दिल्ली : अग्निपथ योजना सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्यात मैलाचा दगड आणि गेम चेंजर ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आज अग्निपथच्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी बोलत होते. मोदी म्हणाले, की तरुण अग्निवीर सशस्त्र दलांना अधिक तरुण आणि तंत्रज्ञान-सॅव्ही (आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान) बनवेल. अग्निवीरांच्या पराक्रमाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांचा आत्मा सशस्त्र दलांचे शौर्य प्रतिबिंबित करतो, ज्यांनी देशाचा ध्वज नेहमीच उंच फडकत ठेवला आहे.
सशस्त्र दलांमध्ये प्रमुख भूमिका बजावेल : या संधीतून त्यांना मिळणारा अनुभव आयुष्यभर अभिमानास्पद ठरेल. नवा भारत नव्या उत्साहाने भरलेला आहे आणि सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 21 व्या शतकात युद्ध करण्याच्या बदलत्या पद्धतींचा संदर्भ देत पंतप्रधानांनी संवादादरम्यान संपर्करहित युद्धाच्या नवीन सीमा आणि सायबर युद्धाच्या आव्हानांवरही चर्चा केली आहे. ते म्हणाले, 'तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैनिक आपल्या सशस्त्र दलात महत्त्वाची भूमिका बजावतील. विशेषत: सध्याच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. म्हणूनच अग्निवीर पुढच्या काळात आपल्या सशस्त्र दलांमध्ये प्रमुख भूमिका बजावेल. या योजनेमुळे महिला अधिक सक्षम होतील, असेही पंतप्रधानांनी सांगितले आहे.
संघभावना आणि नेतृत्व कौशल्य : महिला अग्निवीर नौदलाची शान कशी वाढवत आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिन्ही दलांमध्ये महिला अग्निवीर पाहण्यास आपण उत्सुक आहोत असही ते म्हणाले आहेत. सियाचीनमध्ये तैनात महिला सैनिक आणि आधुनिक लढाऊ विमाने उडवणाऱ्या महिलांची उदाहरणही पंतप्रधानांनी यावेळी दिले आहे. तसेच, वेगवेगळ्या क्षेत्रात नियुक्ती केल्यामुळे अग्निवीरांना विविध अनुभव घेण्याची संधी मिळेल आणि या काळात त्यांनी विविध भाषा आणि विविध संस्कृती आणि राहणीमान जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असही ते म्हणाले आहेत. संघभावना आणि नेतृत्व कौशल्य वाढवल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळेल, असेही ते म्हणाले आहेत.