नवी दिल्ली :मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात खळबळ उडाली आहे. अग्निपथ योजनेबाबत देशातील सर्व राज्यांमध्ये आंदोलने होत आहेत. त्याचबरोबर या योजनेवरून राजकारणही चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ज्या प्रकारे कृषी कायदा मागे घ्यावा लागला, त्याच प्रकारे अग्निपथ योजनाही मागे घ्यावी लागेल.
राहुल गांधी यांनी याप्रकरणी ट्विट करत लिहिले की, 8 वर्षांपासून सातत्याने भाजप सरकारने 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे देशातील तरुणाईची आज्ञा पाळावी लागेल आणि 'अग्निपथ' योजनाही परत घ्यावी लागेल.
रविवारी जंतरमंतरवर काँग्रेसचे आंदोलन :या ट्विटद्वारे राहुल यांनी सरकारने सैनिक आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी काँग्रेसकडून असे सांगण्यात आले होते की, रविवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर पक्ष अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करेल. ताज्या माहितीनुसार, काँग्रेसचे हे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यात अनेक बडे नेते आणि खासदार सहभागी होऊ शकतात. त्याचवेळी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट करून म्हटले की, मी 29 मार्च 2022 रोजी संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहून तरुणांच्या या मागण्यांकडे लक्ष देण्याची आणि त्यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली होती. पण, तरुणांच्या आवाजाला सरकारने महत्त्व दिले नाही.
गदारोळात गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय : देशभरात सुरू असलेल्या या गदारोळात केंद्रीय गृहमंत्रालयाने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये होणाऱ्या भरतीमध्ये 4 वर्षे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना किती टक्के आरक्षण दिले जाईल हे सांगण्यात आले आहे. या निमलष्करी दलात अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.