बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीतील विजयानंतर पक्ष आता पुढचा मार्ग ठरवणार आहे. या अनुषंगाने आज संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची पहिली बैठक होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे वृत्त आहे. यासोबतच सरकार स्थापनेबाबतही चर्चा होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निवडून, आलेले नवे मुख्यमंत्री उद्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात.
दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे असल्याची चर्चा : मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी बंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दोन दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी एक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि दुसरे दावेदार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी उघडपणे दावा मांडला नसला तरी दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे असल्याची चर्चा आहे. सिद्धरामय्या हे मास लीडर म्हणून ओळखले जातात.
2028 च्या विधानसभा निवडणुका डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली : ते मुख्यमंत्रीही राहिले आहेत. तर शिवकुमार हे युवा नेते आहेत. अलीकडच्या काळात ते खूप चर्चेत आहेत. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत दोघांमध्ये सहमती न झाल्यास ठराव मंजूर करून तो काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्याची चर्चा आहे. पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील, अशीही बातमी आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार पुढील तीन वर्षांसाठी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. 2028 च्या विधानसभा निवडणुका डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती आहे.
पाच दिवसांत पाच योजना राबविण्याचे आश्वासन : याशिवाय काँग्रेसने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अनेक योजना राबविण्याची आश्वासने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. या आश्वासनाची अंमलबजावणी करणेही पक्षासाठी महत्त्वाचे आहे. निवडणूक जिंकल्यानंतर पाच दिवसांत पाच योजना राबविण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. या आश्वासनांमध्ये लोकांना 200 युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला 2,000 रुपये प्रति महिना मदत, बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ मोफत देण्याचा समावेश आहे.
हेही वाचा :कर्नाटकमधील निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसचे राज्यसभा निवडणुकीतही होणार पारडे जड