सहरसा :बिहारचे माजी खासदार आनंद मोहन यांना मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्या पॅरोलची मुदत 25 एप्रिलला संपली आहे. त्यामुळे माजी खासदार आनंद मोहन यांना कोणत्याही परिस्थितीत आज कारागृह प्रशासनाकडे आत्मसमर्पण करावे लागणार आहे. त्यामुळे आनंद मोहन हे पाटण्यावरुन मंगळवारी निघाले असून आज ते कारागृह प्रशासनाकडे शरणागती पत्करणार आहेत.
मुलाच्या साखरपुड्यासाठी पॅरोल :माजी खासदार आनंद मोहन यांच्या मुलाचा साखरपुडा असल्याने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पॅरोलची तारीख संपल्याने त्यांनी मंगळवारी पाटण्यावरुन सहरसाकडे प्रयाण केले. मंगळवारी पाटणा येथून बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना त्यांनी मुलगा चेतन आनंदच्या साखरपुड्यासाठी मला १५ दिवसांचा पॅरोल मिळाला होता. पॅरोलचा कालावधी 25 एप्रिलला संपला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बुधवारी सकाळी शरणागती पत्करावी लागणार आहे. त्यानंतर तुरुंगाची कोणतीही प्रक्रिया असेल, ती पूर्ण करून मी बाहेर येणार असल्याची माहिती दिली होती.
आनंद मोहन यांच्या सुटकेचा आदेश :माजी खासदार आनंद मोहन यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठवली आहे. मागील तब्बल 16 वर्षापासून ते कारागृहात बंद आहेत. मात्र आता बिहार सरकारने काही बंदीवानांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या यादीत माजी खासदार आनंद मोहन यांचेही नाव आहे. त्यांच्या नावाला विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाला कोणाचीही हरकत नसावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राजकारणात सक्रीय असण्याचा प्रश्न आहे. मात्र तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर माझ्या जुन्या सहकाऱ्यांसोबत भेट घेऊन त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असेही आनंद मोहन यांनी यावेळी सांगितले. मी माझ्या शिक्षेचा भाग पूर्ण केला आहे, त्यामुळे सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात अर्थ नसल्याचेही आनंद मोहन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
डी एम जी कृष्णैया हत्या प्रकरणात जन्मठेप : गोपालगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या हत्येप्रकरणी आनंद मोहनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 16 वर्षापासून आनंद मोहन तुरुंगात आहेत. त्यांच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे. नुकतेच राज्य सरकारने आनंद मोहन यांच्यासह २७ कैद्यांची सुटका करण्याचे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा - Rapido Driver Misbehavior With Woman : रॅपीडो चालकाचे तरुणीशी गैरवर्तन, चालत्या दुचाकीवरुन उडी घेत पीडितेने करुन घेतली सुटका