नवी दिल्ली - दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची पॉलीग्राफ (Shraddha Murder Case) चाचणी मंगळवारी सायंकाळी उशिरा सुरू झाली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची रोहिणी एफएसएल लॅबमध्ये पॉलीग्राफ चाचणी सुरू झाली होती. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या टेस्टमध्ये काय समोर येते हे पाहावे लागणार आहे. नार्को चाचणी उद्या म्हणजेच बुधवारी होणार आहे. नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टच्या माध्यमातून काही पुरावे जप्त करण्यात यश येईल, जे आफताबला मारेकरी सिद्ध करण्यात महत्त्वाचा दुवा ठरेल, अशी आशा पोलिसांना आहे.
नार्को टेस्ट करण्यास परवानगी -दिल्ली पोलिसांनी नार्को चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. मंगळवारी त्यांनी कोर्टाकडे पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टच्या माध्यमातून काही पुरावे जप्त करण्यात यश येईल, जे आफताबला मारेकरी सिद्ध करण्यात महत्त्वाचा दुवा ठरेल, अशी आशा पोलिसांना आहे.
आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ -आज दिल्लीतील साकेत कोर्टाने आफताबच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. याआधीही पोलिसांनी त्याला दोनदा ५-५ दिवसांच्या कोठडीत पाठवले होते. मात्र, या 10 दिवसांतही पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. तत्पूर्वी दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने श्रद्धा हत्याकांडाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. याचबरोबर याचिकाकर्त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. या युक्तिवादाचा विचार करण्यासाठी आम्हाला एकही योग्य कारण सापडले नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.