आयझोल - भारतात कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. डुकरांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लू आढळला आहे. राज्यात आफ्रिकी स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 9,000 हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लूचा प्रसार झाला आहे. राज्य पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.
सध्या किमान दहा जिल्ह्यातील 152 गावे किंवा स्थानिक भागात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत 36.38 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आफ्रिकन स्वाईन फिव्हर ग्रस्त भागाबाहेर 699 डुकरांचे 'असामान्य मृत्यू' देखील झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आतापर्यंत 1,078 डुकरांना मारण्यात आले आहे. स्वाईन फ्लूमुळे पहिल्या डुकरांचा मृत्यू 21 मार्च रोजी दक्षिणी मिझोरममधील लुंगलेई जिल्ह्यातील लुंगसेन गावात झाला होता. गेल्यावर्षी आसामच्या 306 गावांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लूमुळे 2 हजार 500 डुकरांचा मृत्यू झाला होता.