वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी वायनाडमध्ये बोलताना आदिवासींच्या हक्कांसाठी बाजू मांडली. 'आदिवासी बांधव आणि भगिनी हे देशाचे मूळ मालक असल्याचे ते म्हणाले. तसेच आदिवासींच्या हक्कावर भर देत, त्यांना जमीन आणि जंगलावर हक्क दिले पाहिजेत, असे महत्वाचे विधान राहुल गांधी यांनी केले.
'आदिवासी' शब्दाचा अर्थ जमिनीचे मूळ मालक : 'मी देशभर फिरलो. भारतभरातील आदिवासी बांधवांना भेटलो. 'आदिवासी' या शब्दाचा अर्थ जमिनीचे मूळ मालक असा होतो. आदिवासी म्हणजे, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीच्या पर्यावरणाची जाण असलेला विशिष्ट समाज. याचा अर्थ असा होतो की ते (आदिवासी) या देशाचे मूळ मालक आहेत', असे राहुल गांधी म्हणाले. ते वायनाड येथे एका सभेला संबोधित करत होते.
आदिवासींना जंगलावर अधिकार दिले पाहिजे : 'आदिवासींना जमिनीवर, जंगलावर अधिकार दिले पाहिजेत. त्यांना हवे ते करण्याचे बळ दिले पाहिजे', असेही राहुल गांधी म्हणाले. 'आदिवासींनी आपल्या मुलांना इंजिनीयरिंग करू द्यावे. त्यांनी मुलांना डॉक्टर, वकील बनू द्यावे किंवा व्यवसाय सुरू करावा. त्यांना जंगलात, जमिनीवर अधिकार दिले पाहिजेत. संपूर्ण पृथ्वी त्यांच्यासाठी खुली असावी. त्यांना (आदिवासींना) प्रतिबंधित किंवा वर्गीकृत केले जाऊ नये', असे राहुल गांधी यांनी नमूद केले.
'वनवासी' शब्द मान्य नाही : राहुल गांधी यांनी पुढे बोलताना 'वनवासी' या शब्दाचा वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'वनवासी' या शब्दामागे विकृत तर्क असल्याचे ते म्हणाले. 'आपण आदिवासी म्हणतो तर काही जण 'वनवासी' म्हणतात. मात्र 'वनवासी' या शब्दामागे एक विकृत तर्क आहे. वनवासी हा शब्द तुम्ही भारताचे मूळ मालक आहात असे नाकारतो. हा शब्द तुम्हाला जंगलापुरतेच मर्यादित करतो. 'वनवासी' या शब्दामागची कल्पना अशी आहे की, तुम्ही जंगलातील आहात आणि तुम्ही कधीही जंगल सोडू नका. मात्र हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला हा शब्द मान्य नाही', असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा :
- Rahul Gandhi : तुम्ही मणिपूरमध्ये का गेला नाहीत? कारण...; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर जळजळीत टीका
- Rahul Gandhi : 'मोदींना मणिपूर जाळायचे आहे, सैन्याने मनात आणले तर..', राहुल गांधींचा गंभीर आरोप
- Rahul Gandhi : खासदारकीपाठोपाठ बंगलाही परत मिळाला, राहुल गांधी म्हणतात..