अयोध्या ( उत्तरप्रदेश ) : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात ( Aaditya Thackeray Ayodhya Visit ) आहेत. त्यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात आदित्य हे भगवान श्रीरामाच्या जन्मस्थळी दर्शन घेणार असून, सायंकाळी अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरतीही करणार आहेत. आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. तसेच त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेतेमंडळी अयोध्येत दाखल ( Sanjay Raut In Ayodhya ) झाली असून, पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. अयोध्येत आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद होणार असून, अयोध्येतून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
'असे' आहे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे राजकीय महत्त्व :मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा विरोधामुळे स्थगित करावा लागला. राज ठाकरे यांना कडाडून विरोध करणाऱ्या आयोध्या आणि उत्तर प्रदेश वासियांनी शिवसेना युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मात्र स्वागत केले ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नवीन फायरब्रँड नेते मानले जातात. शिवसेना हि हिंदुत्ववादी संघटना असल्याचा वारंवार उच्चार शिवसेनेकडून केला जातो. बाबरी मशीदीचा ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा हात असल्याचा वारंवार दाखला देत शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे असे सांगून हिंदू मतदारांमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न शिवसेना वारंवार करते आहे. शिवसेना गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात आपले उमेदवार उभे करते आहे शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवता आले नसले तरी विचाराच्या आधारावर शिवसेना उत्तर प्रदेशात पाय पसरू पाहते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा त्या अर्थाने फारच महत्वाचा ठरतो. हळूहळू उत्तर प्रदेशात शिवसेना संघटन मजबूत करण्याकडे आदित्य लक्ष देत आहे तर आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईत असलेली उत्तर भारतीयांची संख्या पाहता हा दौरा त्यादृष्टीने ही शिवसेनेसाठी आणि हिंदुत्ववादी विचारांच्या मतांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
निवडणुकीमुळे बदलली तारीख :2018 पासून उद्धव ठाकरे तीन वेळा अयोध्येला गेले आहेत. आदित्य ठाकरे आधी १० जूनला अयोध्येला जाणार होते, पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अयोध्या भेटीची तारीख बदलून १५ जून करण्यात आली होती.