श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : Aditya L1 : देशाचं पहिलं सौर मिशन 'आदित्य एल १' चं शनिवारी सकाळी ११.५० ला यशस्वी प्रक्षेपण झालं. 'आदित्य एल १' इस्रोच्या 'पीएसएलव्ही' अंतराळयानातून अवकाशात झेपावलं. आता ते 'लॅग्रेंज पॉइंट १' या ठिकाणाहून सूर्याचा अभ्यास करेल. त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लक्ष किमी अंतरावर स्थित आहे.
एल १ का निवडलं : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या सौर वेधशाळेचे प्रमुख एबेनेझर चेलासामी यांनी या पॉइंटबद्दल अधिक माहिती दिली. 'सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित लॅग्रेंज पॉइंट १ वरून सूर्याचं अखंड दृश्य दिसतं. तसंच ते पृथ्वीच्या जवळ असल्यानं, तेथून अंतराळयानाचं दळणवळण सुलभ आहे. इतर बिंदू जसे की, एल ३ आणि एल ४ सूर्याच्या खूप दूर आहेत. तर एल ५ सूर्याच्या मागे आहे. तो आणखी दूर आहे', असं चोलासामी म्हणाले.
लॅग्रेंज बिंदू म्हणजे काय : सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहासाठी किंवा अंतराळातील कोणत्याही दोन वस्तूंसाठी पाच लॅग्रेंज बिंदू आहेत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, इटालियन-फ्रेंच गणितज्ञ-खगोलशास्त्रज्ञ 'जोसेफ लुईस लॅग्रेंज' यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं. अंतराळातील या बिंदूंवर सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती एका अवकाशयानाला स्थिर पॅटर्नमध्ये परिभ्रमण करण्यास परवानगी देतात.