कोलकाता -यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपाचा हात धरला आहे. तर यातच अभिनेता यश दासगुप्ता यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया दासगुप्ता यांनी दिली.
राज्य आणि देशात बदल गरजेचा आहे. त्यामुळे व्यवस्थेच्या बाहेर राहून काहीच केले जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थेचा एक भाग होणे गरजेचे आहे. निवडणुकीत सामील होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत यांच्या मैत्रीबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, की आम्ही दोघेही आपआपल्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांनी एकाच मार्गावर चालावं. हे गरजेचे नाही.