नवी दिल्ली: 2021 च्या लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील ( Red Fort violence case ) आरोपी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा हरियाणातील सोनीपतजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला ( Actor Deep Sidhu Died In Accident ) आहे. पोलिसांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे.
सिद्धूला 9 फेब्रुवारी 2021 रोजी हरियाणातील कर्नाल बायपास येथून अटक करण्यात आली होती. लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा कट त्याने रचला असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
कोठडीत असताना, सिद्धू आणि आणखी एक आरोपी इक्बाल सिंग यांना प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक स्मारकावर घडलेल्या घटनांचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी लाल किल्ल्यावर नेण्यात आले होते. दीप सिद्धू झेंडे आणि काठ्या घेऊन लाल किल्ल्यावर प्रवेश करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट झाल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी म्हटले होते की, सिद्धूने लोकांना चिथावणी दिली, ज्यामुळे लोकांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.
26 जानेवारी रोजी तीन शेतकरी विषयक कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली होती. चकमकीदरम्यान आंदोलकांच्या एका गटाने लाल किल्ल्यावर घुसून धार्मिक ध्वज फडकावल्याचा आरोप होता.