नवी दिल्ली :मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन हे तिहार कारागृहात बंद आहेत. त्यांना कारागृहात सवलत दिल्याप्रकरणी तुरुंग क्रमांक सातच्या जेलरवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जेलरने उदासीनतेचे कारण देत दोन कैद्यांना माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या सेलमध्ये हलवले होते. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांच्या सेलमध्ये हलवण्यात आलेल्या दोन कैद्यांना परत नेण्यात आले. याशिवाय कोटय़वधींची फसवणूक केल्याप्रकरणी तिहारच्या मंडोली कारागृहात बंदिस्त असलेल्या सुकेश चंद्रशेखरचे कारागृहही बदलले जाणार आहे.
सुकेश सध्या मंडोली कारागृहात :कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर हा सध्या मंडोली येथील कारागृह क्रमांक 13 मध्ये कैद आहे. त्याची रवानगी कारागृह क्रमांक 11 मध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सुकेश चंद्रशेखर याच्यावर मंडोली कारागृहातील लँडलाईन फोन प्रणालीशी छेडछाड करून बेकायदेशीर कॉल केल्याचा आरोप आहे. या संदर्भात एमटीएनएलकडून ही छेडछाड कशी आणि कोणत्या वेळी शक्य झाली याची माहिती मागवण्यात आली आहे. लँडलाईन फोन सिस्टीममध्ये किती वेळा छेडछाड झाली आहे, किती वेळा कॉल केले गेले आहेत आणि कोणाला कॉल केले गेले आहेत, याचीही माहिती एमटीएनएलकडून उपलब्ध होणार आहे.