कन्नूर (केरळ) : दिवस होता 27 ऑक्टोबर 2013. विरोधी एलडीएफ, विशेषत: माकप कॅडर, सौर घोटाळ्यातील कथित सहभागासाठी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या विरोधात आंदोलन करत होते. विरोधी पक्षाच्या आंदोलनामुळे केरळ अक्षरश: पेटले होते.
ओमन चंडी यांच्या विरोधात माकपचे आंदोलन : त्या संध्याकाळी ओमन चंडी अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी माकपचा बालेकिल्ला असलेल्या कन्नूरमध्ये आले होते. कन्नूर येथे आयोजित केरळ पोलिस ऍथलेटिक मीटच्या समारोप समारंभाला ते उपस्थित राहणार होते. मात्र तेथे एलडीएफ जिल्हा युनिटने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खुले आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास, माकप कार्यकर्त्यांच्या एका गटाने ओमन चंडींच्या सुरक्षा दलांना ज्या ठिकाणी ते उद्घाटन करणार होते तेथे पोहोचण्यापासून रोखले. त्यानंतर परिस्थिती चिघळली.
आंदोलन चिघळले : पोलिस दल आणि दहशतवाद विरोधी पथकांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला एस्कॉर्ट केले. त्यानंतर चंडी यांच्या ताफ्यावर माकपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. ओमन चंडी यांच्या कारच्या बाजूच्या खिडक्या माकप कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत फुटल्या. काचेचे छोटे तुकडे त्यांच्या कपाळावर लागले आणि ते जखमी झाले. मात्र रक्त आलेल्या परिस्थितीतही, प्राथमिक उपचार करून ते जाहीर सभेला रवाना झाले.
तीन आरोपींना दोषी ठरवले : या प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार के के नारायणन, सी कृष्णन आणि बिजू कंडकई यांच्यासह 120 जणांवर गुन्हा दाखल केला. खटला चालूच राहिला. अखेर न्यायालयाने 110 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आणि तीन आरोपींना दोषी ठरवले. यापैकी एक आरोपी नसीर हा मूळचा थलासरीचा रहिवासी होता, जो त्यावेळी माकपच्या स्थानिक समितीचा सदस्य होता. नसीर या घटना आठवताना म्हणतात की, 'मी माकप स्थानिक समितीचा सदस्य होतो आणि माझ्या राजकीय कार्याचा एक भाग म्हणून कार्यक्रमात सहभागी झालो होतो. पक्षाच्या सूचनेनुसार मी यामध्ये भाग घेतला होता. पण मी मुख्यमंत्र्यांविरोधातील कोणत्याही हिंसाचाराचा भाग नव्हतो'.
आरोपी चंडींच्या वागणूकीने प्रभावित : ते पुढे म्हणाले की, 'कन्नूरमध्ये ओमन चंडी यांच्यावर झालेला हल्ला मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. माझ्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. शेकडो सहआरोपी निर्दोष सुटले, मात्र मला 3 जणांसह दोषी ठरवण्यात आले. काही महिन्यांनी मी ओमन चंडी यांना भेटायला गेलो. त्यावेळी, मी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. यावर ओमन चंडी यांचे उत्तर होते की, त्यांनी काही चुकीचे केले नसेल तर त्यांनी माफी का मागावी?' नसीर म्हणाले की, ओमन चंडी हे माझ्यासाठी देवासारखे माणूस आहेत. ते एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासोबत आलेल्या अनुभवाने मी आश्चर्यचकित झालो.
चंडीच्या शब्दांमुळे पुढे जाण्याची प्रेरणा दिली : नसीर, ओमन चंडी यांची आठवण काढताना म्हणतात की, ते कधीही सामान्य माणसांना भेटण्यास आणि ऐकण्यास तयार असायचे. तत्कालीन विरोधकांनी खोट्या प्रकरणात त्यांची बदनामी केली होती. असे कोणत्याही राजकीय नेत्यासोबत केले जाऊ नये, असे नसीर म्हणतात. नसीर ओमन चंडींवर उपचार सुरू असताना त्यांना अनेकदा भेटायला जायचे. ते सांगतात की, ओमन चंडींच्या शब्दांमुळे त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली. आता ओमेन चंडी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नसीर उद्या पुथुपल्ली येथे जाण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा :
- Oommen Chandy passes away : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास