प्रयागराज (उ. प्रदेश) :उमेश पाल खून प्रकरणात पोलिसांनी सोमवारी एका आरोपीला चकमकीत ठार केले. तसेच हा कट ज्याच्या खोलीत रचला गेला त्या तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या मुस्लिम बोर्डिंग हॉस्टेलचा विद्यार्थी नेता शदाकत खान याला अटक केली आहे.
आरोपीचा अखिलेश यादवसोबत फोटो व्हायरल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खळबळजनक घटनेचा कट शदाकत याच्या खोलीत रचण्यात आला होता. यावेळी पोलिसांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात शदाकत हा दुभाजकाला धडकल्याने जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शदाकत खानला अटक केल्यानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तो समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत दिसतो आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत हा व्हायरल फोटो एका कार्यक्रमातील आहे. आरोपीने अखिलेश यादव यांच्यासोबत उभा राहून हा फोटो क्लिक केला आहे. यासोबतच आरोपीच्या गळ्यात समाजवादी पक्षाचा स्कार्फही दिसतो आहे. यावरून त्याने पक्षाचे सदस्यत्व घेतल्याचे कळते आहे.
हत्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला : या व्हायरल फोटोमध्ये आरोपी शदाकतसोबत सपामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा रिचा सिंगही उभ्या असल्याच्या दिसत आहेत. या प्रकरणी रिचा सिंहने ईटीव्ही भारतला फोनवर सांगितले की, हा फोटो तीन ते चार वर्षे जुना आहे. एवढेच नाही तर या फोटोसोबत आणखी एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माजी खासदार व बाहुबली नेते अतिक अहमद यांचा धाकटा मुलगा अली अहमद याच आरोपीसोबत दिसतो आहे. सध्या अली हा खंडणी व धमकावल्याप्रकरणी नैनी मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. शनिवारी अखिलेश यादव यांनी उमेश पाल याच्या हत्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण आता अखिलेश यादव यांचेच छायाचित्र आरोपीसोबत व्हायरल झाल्याने ते स्वतःच त्यांनी दिलेल्या वक्तव्यात अडकल्याचे दिसत आहे.