मुंबई - यंदा राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज देऊन एक दिवस होत नाही तोवर आता मोसमी पावसाच्या राज्यातील प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत. अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे दोन दिवसांत तळकोकणात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला. दरम्यान, राज्याच्या काही भागांत बुधवारी अवकाळी पाऊस झाला आहे.
मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला. अनुकूल स्थितीमुळे अतिशय वेगाने त्याने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळेच मोसमी पाऊस कोकण आणि गोव्यात वेळेआधीच पोहचण्याची चिन्हे असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, कोकणाबरोबरच मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटकाचा काही भाग, तामिळनाडूचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम, पश्चिम मध्य, ईशान्य भागासह देशाच्या ईशान्य काही राज्ये, सिक्कीम, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या काही भागातही दोन दिवसांत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.