नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानसेवेवर असलेली बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र, यादरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत विमानसेवा सुरूच राहणार आहे. त्यामुळे विदेशात अडकलेले भारतीय याचा फायदा घेऊन देशात येऊ शकतात.
देशासह जगभरात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. काही देशांमध्ये तर कोरोनाची दुसरी लाट येऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने उपाययोजना आणखी तीव्र केल्या आहेत. या अंतर्गतच आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदी वाढवली आहे. २३ मार्चपासून बंद असलेली ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद केली होती. यात आता आणखी एका महिन्याची वाढ केली गेली.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने या काळात विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केलेले आहे. या अंतर्गत भारताने १८ देशांशी 'एअर बबल' करार केला आहे. त्यामुळे विदेशात अडकलेले भारतीय घरी आणण्यास मदत होत आहे. दरम्यान २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
'वंदे भारत मिशन'ला ७ मेपासूनसुरुवात झालेली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त भारतीय नागरिक विदेशातून परत आले आहेत. या मोहिमेच्या सातव्या टप्प्यात नोव्हेंबर अखेर आणखी 24 देशांदरम्यान 1 हजार 57 आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे नियोजन आहे. याअंतर्गत 1 लाख 95 हजार नागरिक भारतात येतील, असा अंदाज आहे.
हेही वाचा -खूशखबर..! १० नोव्हेंबरपासून नांदेड - अमृतसर विमानसेवा पुन्हा सुरू होणार