गोरखपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना आणि कुलसचिवांना अभाविपच्या विद्यार्थी नेत्यांनी मारहाण केली आहे. विद्यापीठातील विविध विभागातील भ्रष्टाचार, अराजकता आणि फी वाढीवरुन अखिल विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी नेते आणि विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात अनेकदा आंदोलने केली होती. परंतु कोणताच निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांनी शुक्रवारी परत एकदा आंदोलन केले. मात्र यावेळी विद्यापीठाच्या इतिहासात कधीच न घडलेली घटना घडली.
विद्यापीठाच्या कुलगुरुंना मारहाण : फी वाढी रद्द करावी आणि मागील आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांना निलंबित केले होते. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी अभाविपच्या विद्यार्थी नेत्यांनी कुलगुरुच्या कार्यालयावर मोर्चा आणला होता. कुलगुरुच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी आपल्या मागण्या मांडत होते. त्याच दरम्यान पोलीस आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर थेट धक्काबुक्कीत होत हाणामारी सुरू झाली. याच दरम्यान काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांना मारण्याचा प्रयत्न केला. वादादरम्यान कुलगुरू आणि कुलसचिव विद्यार्थ्यांच्या गराड्यात सापडले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या दोघांना मारहाण केली. विद्यार्थी नेत्यांनी कुलसचिवांना एवढी मारहाण केली की ते जमिनीवर पडले. कुलगुरूंना जबर मारहाण होणार होती, परंतु त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना कार्यालयात नेल्याने ते वाचले. यासर्व गोंधळात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की सुरू होती.