नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी रविवारी डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप केला आहे. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा आरोप अभविपने केला आहे. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड : रविवारी विद्यार्थी क्रियाकलाप केंद्राच्या भिंतींवर शिवाजी महाराजांचे चित्र लावण्यात आले होते. यावेळी डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या गटाने ही तोडफोड केल्याचा आरोप अभाविप सदस्यांनी केला. जेएनयु अभविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले, 'आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून विद्यार्थी क्रियाकलाप केंद्राच्या बाहेर भिंतींवर शिवाजी महाराजांचे चित्र लावले होते. पण जेएनयुचे कम्युनिस्ट हे पचवू शकले नाहीत. येथे '100 फ्लॉवर्स ग्रुप' आणि एसएफआयचे लोक आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केली.
'आरोपी बाहेरून आले होते' :त्यांनी पुढे आरोप केला की, या घटनेत सहभागी असलेले आरोपी बाहेरील होते आणि त्यांनी परवानगीशिवाय महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश केला होता. आम्ही थांबायला सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही हे करू. आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आमचा फक्त मार्क्सवादी आणि लेनिनवादी विचारसरणीवर विश्वास आहे. अजमेरा म्हणाले की ते त्यांचे ओळखपत्र दाखवू शकले नाहीत तसेच ते बाहेर देखील जात नव्हते.