महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Raghav Chadha : आप खासदार राघव चढ्ढा आणि संजय सिंह राज्यसभेतून निलंबित - Raghav Chadha Sanjay Singh

आप खासदार राघव चढ्ढा आणि संजय सिंह यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राघव चढ्ढा यांच्यावर खासदारांच्या खोट्या सह्या केल्याचा आरोप आहे. तर संजय सिंह यांना राज्यसभेत अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

Raghav Chadha Sanjay Singh
राघव चढ्ढा संजय सिंह

By

Published : Aug 11, 2023, 5:09 PM IST

नवी दिल्ली :खासदारांच्या खोट्या सह्या केल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना शुक्रवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहील. सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांनी या संदर्भातील प्रस्ताव राज्यसभेत मांडला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. मात्र ठराव मंजूर करताना अनेक विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून आधीच सभात्याग केला होता.

राघव चढ्ढांवरील आरोप : चढ्ढा यांनी राज्यसभेत 'गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक, 2023' मंजूर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवड समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी या समितीमध्ये चार खासदार - सस्मित पात्रा, एस. कोन्याक, एम थंबीदुराई आणि नरहरी अमीन यांची नावे त्यांच्या परवानगीशिवाय समाविष्ट केली आहेत.

राघव चढ्ढा यांनी आरोप फेटाळले : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी या खासदारांच्या तक्रारी विशेषाधिकार समितीकडे पाठवल्या. चढ्ढा यांनी नियमांचे उल्लंघन करून त्यांची नावे सभागृहाच्या निवड समितीमध्ये त्यांच्या संमतीशिवाय समाविष्ट केल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे. चढ्ढा यांनी मात्र पत्रकार परिषदेत हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. त्यांनी दावा केला की, एखादा खासदार त्यांच्या लेखी संमती किंवा स्वाक्षरीशिवाय निवड समितीसमोर दुसऱ्या सदस्याचे नाव सुचवू शकतो.

आपचे खासदार संजय सिंहही निलंबित : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी आप खासदार संजय सिंह यांनाही संसदेच्या संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून निलंबित केले आहे. विशेषाधिकार समितीची चौकशी होईपर्यंत संजय सिंह राज्यसभेतून निलंबित राहतील. संजय सिंह यांना राज्यसभेत अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या मागणीवर विरोधक ठाम होते. तेव्हा सभापती जगदीप धनखर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल, असे सांगितले. मात्र, प्रश्नोत्तराचा तास काही मिनिटेच चालला. यानंतर संजय सिंह सभापतींच्या खुर्चीजवळ आले. अध्यक्षांनी त्यांना परत जाण्यास सांगितले, मात्र त्यांनी ते मान्य केले नाही. त्यानंतर पीयूष गोयल यांनी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi : 'मोदींना मणिपूर जाळायचे आहे, सैन्याने मनात आणले तर..', राहुल गांधींचा गंभीर आरोप
  2. Parliament Monsoon Session 2023 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरींचे निलंबन प्रकरण, काँग्रेसने आज बोलावली खासदारांची बैठक
  3. Kalavati Story: काँग्रेस खासदाराची अमित शाह यांच्याविरोधात विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस, काय आहे नेमके प्रकरण?

ABOUT THE AUTHOR

...view details