नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने आज (रविवार) गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीच्या उपराज्यपालांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दिल्ली महानगरपालिकेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी आपने लावून धरली आहे. मात्र, आपने आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याचे म्हणत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी करा -
अतिशी यांच्यासह आंदोलनात आपचे आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांबरोबर धक्काबुक्की केली. तर अतिशी यांना उचलून पोलीस गाडीत टाकले. लोकांकडून घेतलेल्या अडीच हजार कोटींचा हा विषय आहे. महानगरपालिकेने या पैशांचा भ्रष्टाचार केला असून याची चौकशी झाली पाहिजे, असे अतिशी म्हणाल्या.
पोलिसांबरोबर आंदोलकांची धक्काबुक्की
अमित शाह यांच्या निवास्थानी आंदोलन करण्यास गेले असता आपचे आमदार राघव चढ्ढा आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर उपराज्यपालांच्या निवासस्थानी आंदोलनास गेले असता अतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरिता सिंह यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत धक्काबुक्कीही झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते आणि आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवर अतिशी यांनी टीका केली. याच पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी आंदोलन करण्यास भाजपाला परवानगी दिली होती. मात्र, आम्हा पाच लोकांना अडवण्यासाठी पाचशे पोलीस हजर झाले आहेत, असे अतिशी म्हणाल्या.