रांची (झारखंड) Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (शुक्रवार, १७ नोव्हेंबर) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली. ते ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसतर्फे आयोजित 'थिंक २०२४' मध्ये सहभागी होण्यासाठी रांची येथे गेले होते. कॉंग्रेस नेते शशी थरूर देखील त्यांच्यासोबत होते.
केंद्र सरकारवर जोरदार टीका : झारखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर चर्चा केली. यानंतर त्यांनी शशी थरूर आणि सुवीर सरन याच्यासोबत 'थिंक २०२४' चर्चासत्रात हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 'देशभरातील तरुणांची विचारसरणी वेगळी आहे. देशातील तरुणांना रोजगाराची, जीवन सुखकर कसं होईल याची चिंता आहे. मात्र आज केंद्र सरकार काय करत आहे? लोकांना आपापसात भांडायला लावण्याशिवाय ते काही काम करत नाहीत", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही हिंदू आहोत : "पक्ष फोडणाऱ्या आमच्या पक्षाच्या गद्दार आमदारांनी आधी राजीनामे द्यायला हवे होते. मात्र ते मंत्री आणि मुख्यमंत्री झालेत", असं आदित्य ठाकरे म्हणाले. "जनतेचं प्रेम माझ्यावर आणि माझ्या पक्षावर आहे. त्यामुळेच ते नागरी निवडणुका घेत नाहीत", अशी टीका त्यांनी केली. आम्ही हिंदू आहोत पण बिल्किस बानोच्या दोषींना माफ करणाऱ्या हिंदुत्वाच्या बाजूनं नाही. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरात सर्वांचं योगदान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ते बांधलं जातंय. मात्र केंद्र सरकारला याचं श्रेय घ्यायचंय. हे चुकीचे आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.