अलापुझा : महाभयंकर अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसलेल्या केरळमधील एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एका मोठ्या पातेल्यात बसून पुराच्या पाण्यातून विवाहस्थळी जाणाऱ्या वधु-वराचा हा व्हिडिओ आहे.
पुरातून वाट काढत बांधली लग्नगाठ
पुरामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेले असताना विवाह स्थळ गाठण्यासाठी या वधु वरांना चक्क पातेल्यातून अशा पद्धतीने प्रवास करावा लागला. अलापुझामधील थलवडीतील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या वधु-वरांचे नाव आकाश आणि ऐश्वर्या असे आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर यासिर मुश्ताक या युझरने ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
केरळला पुराचा तडाखा
केरळमध्ये शनिवारी, रविवारी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे केरळमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले होते. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी रविवारी सकाळी बेपत्ता नागरिकांचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट -
मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इडुक्की, कोट्टायम आणि पथानामथिट्टा या भागातील नागरिकांना वीज आणि अन्य अजूनही उपलब्ध होत नाही. तसेच केरळ राज्य सरकारने धरण क्षेत्रात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच केरळमधील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा -Kerala Flood : पावसाचा कहर; आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा