चेन्नई : मंदिरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोराला मंदिराचा दरवाजा उघडता न आल्याने तो तेथेच झोपी गेला. मात्र सकाळी मंदिरात आरतीसाठी आलेल्या गुरुजीला मंदिरात चोर झोपलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी आरडाओरडा करुन नागरिकांना जमा केले. त्यानंतर या चोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची घटना चेन्नईतील व्यासरपडी शर्मा नगरमध्ये मंगळवारी घडली.
चोरी करताना मंदिरात झोपला चोर : चेन्नतील व्यासरपाडी शर्मा नगरात वेत्री विनयागर हे 50 वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिरात नेहमीप्रमाणे आरतीसाठी मंदिराचे गुरुजी सकाळी गेले होते. मात्र त्यांना मंदिरातील दानपेटीजवळ एक व्यक्ती झोपलेला आढळल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. मंदिरात चोर झोपलेला असल्याने नागरिकांनी मोठा गदारोळ केला.
मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न : मंदिरात घुसलेल्या चोरट्याने मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दानपेटी फोडता आली नाही. या चोराने 13 फेब्रुवारीलाच मंदिरात प्रवेश केल्याची माहिती यावेळी नागरिकांना मिळाली. मंदिरात चोरीसाठी चोर घुसल्याची माहिती मिळताच मंदिराच्या ट्र्स्टींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मंदिरात घुसलेल्या चोराट्याला पोलिसांच्या हवाली केले.