लखनऊ Consecration of Ram Temple : भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर उभारणीमुळं अयोध्या हे एक नवीन व्यावसायिक स्थान म्हणून उदयास आलंय. अयोध्या शहर आणि आसपासच्या महामार्गांवर व्यावसायिक मालमत्ता तसंच निवासी मालमत्ता खरेदी करुन लोक गुंतवणूक करत आहेत. अलीकडेच मुद्रांक विभागाला अयोध्येत केलेल्या नोंदणीतूनही भरपूर कमाई होत आहे. सरकारला इथून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. कमी कालावधीत जमिनीच्या अनेक पट अधिक नोंदणी झाल्या आहेत. एक काळ होता जेव्हा इतर मोठ्या शहरांमध्ये लोक व्यवसाय करण्यासाठी मालमत्ता खरेदी करत होते. परंतु आता लोक 'रामनगरी' अयोध्येत जमीन खरेदी करत आहेत.
मुद्रांक व नोंदणी विभागाच्या आकडेवारीत दीड पटीनं वाढ : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. धार्मिक नगरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून, आता राम मंदिराच्या उभारणीला चांगलाच वेग आलाय. याबाबत अनेक व्यावसायिक आणि इतर लोकांना केवळ अयोध्येतच व्यवसाय करायचा नसून त्यांना अयोध्येत राहायचं आहे. त्यामुळंच मुद्रांक व नोंदणी विभागाच्या आकडेवारीत अलिकडच्या वर्षांत दीड पटीनं वाढ झालीय. यामुळं मुद्रांक आणि नोंदणी विभागाला अयोध्येतील जमिनींच्या रजिस्ट्रीतूनही भरपूर पैसा मिळतोय.
धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत अयोध्या अव्वल स्थानावर :लोक अयोध्यामध्ये जमीन खरेदी करत आहेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहेत. इथं आश्रम हॉटेल, गेस्ट हाऊस, विश्रामगृहं, मंदिरांसाठी मालमत्ता खरेदी केली जात आहे. पाच वर्षांपूर्वी अयोध्येत वर्षाला सुमारे 28,000 रजिस्ट्री होत्या. आता ही संख्या 50,000 च्या वर पोहोचली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर कोट्यवधी भाविक येण्याचे अंदाजही वर्तवले जात आहेत. उत्तर प्रदेशसाह इतर राज्यांतून दररोज लाखो भाविक सातत्यानं अयोध्येला पोहोचत आहेत. याचाच परिणाम असा आहे की अयोध्या धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचत आहे.