रत्नागिरी - दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते आणि आमदार अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया यांनी अनिल परब यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील नगर दापोली तालुक्यात फसवणूक आणि बनावट रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. 2017 मध्ये अनिल परब यांनी हा भूखंड विकत घेतला आणि कोरोनाच्या काळात या शेतीच्या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्याचे काम करण्यात आले असही ते म्हणाले आहेत.
भाजप नेते किरीट सोमैय्या यांचे ट्विट 4 वर्षांचा टॅक्स तलाठ्याकडे भरला - 7 मे 2021 रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी 10 महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केले. 10 मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. 11 मे 2021ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 या काळासाठीचा 4 वर्षांचा टॅक्स तलाठ्याकडे भरला, असा दावा किरीट सोमैय्यांनी केला होता.
रिसॉर्ट पाडण्यात का येऊ नये - आपल्याला या कारवाईत अडकवले जात आहे- शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे ते रिसॉर्ट असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, ते रिसॉर्ट पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आले असून त्याविरोधात कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली होती. गेल्याच महिन्यात पर्यावरण मंत्रालयाने रिसॉर्ट पाडण्यात का येऊ नये, अशी विचारणा करणारी 'कारणे दाखवा' नोटीस रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना बजावली होती. या नोटिशीविरोधात कदम यांनी वकील साकेत मोने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. अनिल परब यांच्यासोबतच्या राजकीय विरोधामुळे आपल्याला या कारवाईत अडकवले जात आहे. त्यातूनच ही कारवाईची नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.
रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जाते -काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी साई रिसॉर्टबद्दल अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम आहेत, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे, तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झाले नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे असही ते म्हणाले होते.
काय आहे प्रकरण ? -सदानंद कदम यांनी याचिकेतून दावा केलाय की साल 2017 मध्ये अनिल परब यांच्याकडून इथं बंगला बांधण्यासाठी आपण भूखंड खरेदी केला होता. सप्टेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्यांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांनी जमिनीचं बिगर-कृषी प्रयोजनात रूपांतर करण्यास त्यांना परवानगी दिली होती. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये आमच्यात विक्री करार अंमलात आणला गेला. जमिनीच्या नावात बदल करण्यात आल्याच्या महसूल नोंदी असताना अनिल परब हे माजी मुख्यमंत्र्याचे निकटवर्ती असल्यामुळे तसेच या जागेचेही ते माजी मूळ मालक असल्यामुळे विरोधी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली आज आपल्याला नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. असा दावा कदम यांनी याचिकेतून केला आहे.
केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार - सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते. त्यानंतर सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. दापोलीत असलेलं हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने सांगितले होते. तसेच, ते तोडण्याचे आदेशही दिले होते. 90 दिवसांत मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. त्यामुळे या रिसॉर्टचे पाणी आणि विजेचं कनेक्शन ताबडतोब तोडण्यात यावे, असं पत्र भाजप नेते किरीट सोमैय्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते.