देहराडून : उत्तराखंडच्या सूरसिंग धारमधील एका सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या महाविद्यालयातील तब्बल ९३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
यानंतर या महाविद्यालयाच्या वसतीगृहाला कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तेहरीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याबाबचे आदेश दिले. एकूण २०० विद्यार्थ्यांचे स्वॅब सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. यांपैकी ६५ विद्यार्थी निगेटिव्ह आले असून, काही विद्यार्थ्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये उत्तराखंडमध्ये ५ हजार ८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर ८१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ३३० वर पोहोचली असून, आतापर्यंत राज्यात २,१०२ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ४३३ वर पोहोचली असून, आतापर्यंत एकूण १ लाख ८ हजार ९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारने सर्व सरकारी कार्यालये २३ ते २८ एप्रिलपर्यंत बंद राहतील असे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :दिल्लीत ऑक्सिजन अभावी 21 रुग्णांचा मृत्यू, 200 रुग्णांची मृत्यूशी झुंज