देहराडून :उत्तराखंडच्या पिथौरगडमध्ये तब्बल सात हजार फुटांवर एक मोठा कोब्रा दिसून आला आहे. पहिल्यांदाच कोब्रा साप एवढ्या उंचीवरील प्रदेशात दिसून आला आहे. त्यामुळेच हा कुतुहलाचा विषय ठरत आहे. एवढेच नाही; तर हा कोब्रा विशेष असण्याचं दुसरं कारण म्हणजे याची लांबी! हा कोब्रा तब्बल नऊ फूट लांब आहे. मुनस्यारीच्या नंदा देवी मार्गावर स्थानिकांनी या कोब्राला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
सामान्यतः कोब्रा साप हा समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर दिसून येतो. मात्र, पहिल्यांदाच २,२४० मीटर उंचीवर हा साप दिसून आल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचेही वातावरण आहे. वन विभागानेही हा साप कोब्राच असल्याचे स्पष्ट केले आहे. पिथौरगड वन विभागाचे रेंजर दिनेश जोशी यांनी सांगितले, की कोब्रा हा सामान्यतः कमी उंचीवरील उष्ण ठिकाणी दिसून येतो. मात्र, तरीही मुनस्यारीमध्ये कोब्रा दिसून येणे ही खरंच आश्चर्याची बाब आहे.