श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी सात पाकिस्तानी नागरिकांसह 89 अतिरेक्यांना ठार केले आहे. ही माहिती लष्कर आणि पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु यावर्षी अधिक कमांडर मारले गेले, असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सांगितले.
जम्मू-कश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या अतिरेक्यांच्या संख्येबाबत त्यांनी माहिती दिली, की केंद्रशासित प्रदेशात सुमारे 200-225 दहशतवादी सक्रिय होते. मात्र, आतापर्यंत नियंत्रण रेषेवर (एलओसी) कोणतीही यशस्वी घुसखोरी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एक किंवा दोन घुसखोरीची माहिती मिळाली आहे. घुसखोरांना शोधण्यासाठी आम्ही ऑपरेशन सुरू केले आहेत. परंतु, ग्राउंड इनपुटनुसार, घाटीतील 15 कॉर्प्स झोनमध्ये आतापर्यंत कोणतीही यशस्वी घुसखोरी झालेली नाही, असे लेफ्टिनेंट जनरल पांडे यांनी सांगितले.
उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या शोकबाबा सुम्लर-अरागम भागात झालेल्या ऑपरेशनबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की गेल्या आठवड्यात तीन अतिरेकी मारले गेले. तीन दहशतवाद्यांपैकी दोन जणांनी 2017-18 मध्ये व्हिसा वापरून पाकिस्तानचा प्रवास केला होता. तरुणांना येथून घेऊन जाणे, त्यांना तेथे (पाकिस्तानात) प्रशिक्षित करणे आणि नंतर त्यांना दहशतवादी बनवून परत पाठवले जाते. व्हिसासाठी योग्य प्रमाणपत्र दिल्यानंतर किमान 40 युवकांनी अभ्यासाच्या उद्देशाने पाकिस्तानात व्हिसावर प्रवास केला आहे. परंतु त्यांना दहशतवादी म्हणून येथे परत पाठवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.