हैदराबाद - 9 ऑगस्ट हा 'ऑगस्ट क्रांती दिन' म्हणून साजरा केला जातो. आज 'ऑगस्ट क्रांती दिना'ला 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन' म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्याला हादरा बसला होता. तेथून पुढे पाच वर्षांनी भारताला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे या दिवसाला भारताच्या इतिहासात खूप महत्त्व आहे.
80 वर्षापूर्वी म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ब्रिटीशांनी महत्मा गांधी, पंडीत जवारलाल नेहरूंसह इतर महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यास सुरु केली. महात्मा गांधींनी यावेळी 'करो या मरो' असा नारा दिल्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात उत्साह होता. त्यानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरत क्रांतीची मशाल पेटवली. या आंदोलनाची व्याप्ती देशभरात पसरली होती. या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्यालाही हादरा बसला होता. दरम्यान, या आंदोलनाला दुसऱ्या महायुद्धाचीही पार्श्वभूमी होती. जपान सिंगापूर, मलाया आणि बर्मा जिंकून भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला होता. अशा वेळी मित्र राष्ट्रांसाठी भारतीयांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा होता. यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड लिनलिथगो. त्यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता भारत दुसऱ्या महायुद्धात सहभागी होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र, काही दिवसांनी दुसऱ्या महायुद्धाच्या सहभागाबदल्यात स्वांतत्र्याची मागणी भारतीय नेत्यांकडून करण्यात आली.