उत्तर कन्नड (कर्नाटक) : बुधवारी कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा तुमचा आमचा सर्वांचाच अगदी जवळचा संबंध आहे. येथे मोबाइल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या कारवार तालुक्यातील सिद्धर येथील ही घटना आहे. या अपघाताने परिसरातील नागरिक हादरले आहेत.
खेळता-खेळता चार्जरची पिन तोंडात घातली : झाले असे की, सिद्धर येथील संतोष कलगुटकर आणि संजना कलगुटकर यांच्या घरात मोबाइल चार्जर सॉकेट प्लग इन केले होते. मात्र कुटुंबातील सदस्यांनी त्याचा पॉवर सप्लाय बंद केला नाही. दुर्दैवाने, त्यावेळी शेजारी खेळणाऱ्या त्यांच्या 8 महिन्यांच्या चिमुरडीने खेळता-खेळता चार्जरची पिन तोंडात घातली. त्याचवेळी तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती मुलगी जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकताच कुटुंबीय धावत आले. त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी झाले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत संतोष कलगुटकर आणि संजना कलगुटकर यांची आठ महिन्यांची मुलगी सानिध्या कलगुटकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.