हैदराबाद -तेलंगणामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे प्राण्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. हैदराबादमधील नेहरू प्राणीसंग्रहालयामधील 8 सिंहामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. या सिंहांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या 8 सिंहांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे सिंहाचे नमुने सीसीएमबी (द सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी) यंत्रणेकडे पाठविण्यात आले होते. हे तपासणी अहवाल आज मिळाले आहेत. तपासणी अहवालानुसार 8 सिंहांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सिंहांना ठेवण्यात आले विलगीकरणात!
सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांचे वर्तवणूक आणि खाणे सामान्य आहे. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी आणि येणाऱ्या अभ्यागतांच्या काळजीसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने म्हटले आहे.