पुणे : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारंच अशा शब्दांत इंग्रजांना ठणकावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान राहिलंय. इंग्रजांविरोधात जनमानस घडवण्यात टिळकांनी केसरी आणि मराठा या वृ्त्तपत्रांत लिहिलेल्या अग्रलेखांची महत्वाची भूमिका राहिलीय. त्यामुळंच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं संबोधलं जातं.
स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान बहुआयामी नेतृत्व
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी योगदान दिले. यापैकी सर्वात महत्वाचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे. सर्व भारतीयांनी टिळकांचे नेतृत्व स्वीकारले होते. टिळकांचे नेतृत्व बहुआयामी होते. इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी टिळक सर्व मार्गांनी प्रयत्न करत होते असे इतिहास अभ्यासक मोहन शेट्टे सांगतात.
वाटचाल
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमध्ये झाला. 1866 मध्ये टिळक आई-वडिलांसह रत्नागिरीहून पुण्यात आले. इथंच त्यांनी 1872 मध्ये मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केलं. त्यापूर्वी 1871 मध्ये कोकणातील बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाईंशी त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर टिळकांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1876 मध्ये ते डेक्कनमधून बीए पास झाले. इथंच त्यांची आगरकरांशी ओळख झाली आणि मग दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. पुढे टिळक आणि आगरकरांनी 1881 मध्ये आर्यभूषण हा छापखाना काढून केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रं सुरू केली. यातलं केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत होतं. यापैकी केसरीचं संपादकपद हे आगरकरांकडे तर टिळकांकडे मराठाचं संपादकपद होतं. मात्र नंतर आगरकरांसोबत टिळकांचे मतभेद झाले आणि त्यांनी कर्जासह केसरीचं संपादकपद स्वतःकडं घेतलं. त्यानंतर दोन्ही वृत्तपत्रांची जबाबदारी टिळकांनी सांभाळली. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांमध्ये टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. त्यांचे केसरी आणि मराठातील अनेक अग्रलेख चांगलेच गाजले होते. वृत्तपत्रांतून इंग्रज सरकारवर केलेल्या टीकेमुळं त्यांना तुरुंगवासातही जावं लागलं. मात्र तरीही इंग्रज सरकारविरोधात त्यांची लेखणी थांबली नव्हती.
वृत्तपत्रांची निर्मिती
वृत्तपत्रांच्या निर्मितीचं महत्वाचे काम टिळकांनी केले. टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांची मने घडविण्याचे काम केले. त्यांनी वृत्तपत्रांना मतपत्र बनविले. केसरी आणि मराठा मंगळवारी प्रकाशित होत असे. तेव्हा या दोन्ही वृत्तपत्रांच्या अंकाची वाट वाचक मोठ्या उत्सुकतेने बघायचे. वृत्तपत्रातून टिळक आपल्याला काय मार्गदर्शन करतात यासाठी वाचक उत्सुक असायचे असेही मोहन शेट्टे म्हणाले. बंगालच्या फाळणीनंतर सर्व देशभर प्रक्षोभ उसळला आणि उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा हिरिरीने पुरस्कार केला. इंग्रजांविरोधात लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचीही सुरूवात केली. शिवजयंती गावागावात साजरी करण्यासोबतच देशातील अनेक ठिकाणीही साजरी केली जावी यासाठी टिळकांनी प्रयत्न केले. गणेशोत्सवाची सुरूवातही टिळकांनी केली. इंग्रजांशी लढण्यासोबतच देशातील ऐक्य कायम टिकावे हाच यामागील उद्देश होता असे शेट्टे सांगतात.
टिळकांनी दिला मंत्र
संपूर्ण देशात स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. केसरीच्या माध्यमातून त्यांनी अग्रलेख लिहिले. यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. जनजागृती करण्यासाठी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचा वापर त्यांनी केला. स्वराज्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा मंत्र टिळकांनी दिला असे टिळकांचे पणतू रोहित टिळक म्हणतात. देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असताना टिळकांसारख्या ओजस्वी स्वातंत्र्यसेनानीचे स्मरण आजही आपल्याला प्रेरणा देते. देशासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या लोकमान्यांना यानिमित्तानं त्रिवार नमन.