नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकांना सर्वतोपरी मदत करत स्वातंत्र्य आंदोलनात अनेकांनी योगदान देण्याचे काम केले. अशाच विस्मरणात गेलेल्या क्रांतीवीरांची कहाणी सांगण्याचे काम सध्या ईटीव्ही भारत करत आहे. स्वातंत्र्य आंदोलनात अशाच पद्धतीने योगदान देणारे डॉ. मुख्तार अहमद अन्सारी आणि हकीम अजमल खान या दोघांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे दोघे स्वातंत्र्य सेनानींवर उपचार करण्याचे काम करायचे. स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी या दोघांनी उत्तमरित्या पेलली. डॉ. मुख्तार अहमद अन्सारी आणि हकीम अजमल खान यांनीच प्रतिष्ठित जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉ. अन्सारी 1928 ते 1936 पर्यंत या विद्यापीठाचे कुलगुरू राहिले. या दोघांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका बजावली. ते काँग्रेस आणि मुस्लीम लीगचेही सदस्य होते. डॉ. एमए अन्सारींनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान दिल्याचे इतिहास अभ्यासक सोहेल हाश्मी सांगतात. त्या काळात कोलकाताचे डॉ. बिधान चंद्र राय, मुंबईतील मिरजकर आणि दिल्लीतील डॉ. मुख्तार अहमद अन्सारी हे तिघे प्रसिद्ध सर्जन होते. दिल्लीतील दरियागंजमध्ये डॉ. अन्सारींचे मोठे घर आहे. तिथेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते येत असत.
दिल्लीत जेव्हा जेव्हा काँग्रेसचे संमेलन झाले, तेव्हा येणारे सर्व म्हणजेच जवळपास हजार ते बाराशे डेलिगेटस् हे अन्सारींच्या घरी यायचे. त्या सर्वांच्या खाण्या-पिण्यासह राहण्याची सर्व व्यवस्था डॉ. अन्सारी करायचे. उपचारासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक डॉ. एमए अन्सारींच्या घरी यायचे. अन्सारी त्यांना आपल्या घरात आसराही द्यायचे आणि त्यांच्यावर उपचारही करायचे असे इतिहास अभ्यासक सोहेल हाश्मी म्हणतात. तेव्हा डॉ. अन्सारींची कन्सल्टेशन फी 35 रुपये इतकी होती. ते एका दिवसात दहाच्या आसपास रुग्णांनाच बघायचे. यापैकी बहुतेक रुग्ण स्वातंत्र्य सैनिक असायचे. पोलीस कारवाईत जखमी झालेले, गोळी लागलेले, लाठीमार झेललेले असे रुग्ण यात असायचे. असे रुग्ण लपून-छपून डॉ. अन्सारींकडे यायचे. डॉ. अन्सारी त्यांच्यावर उपचार करायचे, त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करायचे. परत जाण्यासाठी त्यांना भाड्याचे पैसेही डॉ. अन्सारी द्यायचे. स्वातंत्र्य सेनानी डॉ. मूलराज मेहता हे आजारी होते तेव्हा डॉ. अन्सारींनी तीन महिने त्यांना आपल्या घरात ठेवून त्यांच्यावर उपचार केले. याचा सर्व खर्च डॉ. अन्सारींनीच केला. जेव्हा त्यांना घरी जायची वेळ आली तेव्हा अन्सारींनी त्यांना 300 रुपये दिले. तेव्हा मूलराज यांनी हे पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा अन्सारींनी त्यांना तुम्ही माझ्या मुलासारखे आहात, असे सांगून त्यांना पंजाबला घरी परत जाण्यासाठी खर्चाचे पूर्ण पैसे दिल्याचे हाश्मींनी सांगितले.
तेव्हा उपचाराची गरज असणारे बहुतेक सर्व स्वातंत्र्य सैनिक डॉ. अन्सारींकडे यायचे. यात काँग्रेससह समाजवादी तसेच इतर सर्व विचारसरणीचे लोक असायचे. ते डॉ. अन्सारींच्या घरात लपायचे आणि अन्सारी त्यांची मदत करायचे. हे त्यांचे महत्वाचे योगदान होते. गांधीजींनी जेव्हा एकदा स्वातंत्र्य सैनिकांना दिल्लीत विचारले होते की, तुमचा बादशहा कोण आहे, तेव्हा त्यांनी डॉ. अन्सारी आणि हकीम अजमल खान या दोघांचीच नावे घेतली होती. काँग्रेसच्या दिल्लीतील जवळपास सर्व महत्वाच्या बैठकांचा खर्च डॉ. अन्सारी स्वतः करायचे असे हाश्मींनी सांगितले.