हैदराबाद - तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि मुख्यमंत्री के सी राव यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याबाबत आज पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरीमध्ये माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा के सी राव यांच्यावर निशाना साधला आहे. तेलंगणात काय चालले आहे ते लोक पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांकडून होत असलेला संविधानाचा अवमान इतिहासात नोंदवला जाईल असेही तमिलिसाई म्हणाल्या. प्रजासत्ताक दिन सोहळा सार्वजनिक ठिकाणी होऊ नये, यासाठी काही लोकांनी प्रयत्न केल्याचा त्यांनी आरोपही केला आहे.
प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सरकारला पत्र :राज्यपाल तमिलिसाई म्हणाल्या, प्रजासत्ताक दिन भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी सरकारला पत्र लिहिले होते. सरकारने दोन दिवसांपूर्वी राजभवनात उत्सव साजरा करावा, असे सांगितले. मात्र तरीही केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांकडे राज्याने दुर्लक्ष केले. त्याचे उत्तरही सरकारने पाठवले नाही. नागरिकांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केल्याने आनंद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनानंतर प्रथमच राजभवनात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला.
राजभवनात फडकावला राष्ट्रध्वज :राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त हैदराबाद येथील राजभवनात राष्ट्रध्वज फडकावला. मात्र या सोहळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सहभागी झाले नाहीत. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद आणखी उफाळून आला. राज्यपालांनी लोकशाहीचा सन्मान करण्याचे आवाहन केले. आपण नागरिकांसाठी काम करणार असल्याने काही जणांना ते आवडत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.