हैदराबाद -तेलंगाणातील रामोजी फिल्म सिटीमध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. रामोजी ग्रुपचे चेयरमन रामोजी राव यांनी यावेळी राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर सुरक्षा जवानांनी त्यांना सलामी दिली. यावेळी बोलताना त्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रामोजी फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सी एच विजयेश्वरी, ईटीव्ही भारतच्या व्यवस्थापकीय संचालिका बृहती चेरुकुरी, यांच्यासह रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो प्रजासत्ताक दिन :रामोजी फिल्मसिटीमध्ये दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होतात. रामोजी फिल्म सिटी ही हैदराबाद शहराजवळ वसलेली जागतिक दर्जाची फिल्म सिटी आहे. या फिल्मसिटीत विविध फिल्म स्टुडिओची सुविधा आहे. फिल्म सिटी 1,666 एकरमध्ये पसरलेली आहे. रामोजी फिल्म सिटी जगातील सगळ्यात मोठी फिल्मसिटी म्हणून गणली जाते. या फिल्मसिटीत जगातील सर्वात मोठे फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणित केले आहे.
निसर्गाच्या सौंदर्यात खास मनोरंजनात्मक कार्यक्रम :सध्या रामोजी विंटर फेस्टिव्हलमध्ये निसर्गाच्या सौंदर्यात खास मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू आहेत. फिल्मसिटीमध्ये विंटर फेस्टीवलच्या पहिल्याच दिवशी लाखो पर्यटकांची वर्दळ होती. रामोजी फिल्म सिटी विंटर फेस्टीवलचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन कार्यक्रम आयोजित करून प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. सध्या रामोजी फिल्मसिटीत विंटर फेस्टीवल सुरू आहे. रामोजी फिल्म सिटीतील विंटर फेस्टीवल ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे पर्यटक प्रथम पसंती रामोजी फिल्मसिटीला देत असल्याचे दिसून येते.