पाटणा - इंग्लडहून पाटणा येथे परतलेल्या ७१ प्रवासांचा ठावठिकाणा लागत नसल्याने स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली आहे. एकून ९६ प्रवासी मागील काही दिवसांपूर्वी ब्रिटनहून पाटण्यात आले आहेत. मात्र, त्यातील ७१ जणांचा पत्ता लागत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, हे प्रवासी घरी सापडले नाहीत. ब्रिटनमध्ये कोरोना नवा विषाणू सापडल्यानंतर भारताने विमान सेवा बंद केली आहे.
आत्तापर्यंत सहा रुग्ण सापडले -
नवा विषाणू पहिल्यापेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याने ब्रिटनहून भारतात आलेल्या नागरिकांना विगलीकरणात ठेवण्यात येत आहे. ब्रिटनहून भारतातील विविध विमानतळांवर अनेक प्रवासी उतरले आहेत. त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यातील अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. नव्या विषाणूने बाधित असलेले सहा रुग्ण भारतात आढळून आले आहेत.
प्रवासी फोन उचलेना -
ब्रिटनहून पाटण्यात माघारी आलेल्या ९६ नागरिकांपैकी फक्त २५ जणांचे नमुने बुधवारी घेण्यात आले आहेत. २५ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. हे सर्वजण २३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या काळात ब्रिटनहून भारतात आले आहेत. या नागरिकांचे पत्ते, फोननंबर आमच्याकडे असून यातील काही फोन लागत नाहीत, तर काहीजण फोन उचलत नाहीत. घरी जाऊन चौकशी केली असता यातील अनेक जण घरी नसल्याचे सांगण्यात आले. ते सर्वजण कोठे गेले आहेत, याची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे पाटणाच्या जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक विभा कुमारी सिंह यांनी सांगितले.
नवा विषाणू जास्त घातक -
ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना नवा विषाणू पहिल्यापेक्षा जास्त घातक आहे. याचा प्रसार जास्त जलद गतीने होते. तसेच हा ७० टक्के जास्त संसर्गजन्य आहे. दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा नवा विषाणू सापडला आहे. मात्र, नव्या विषाणूवर आधीच तयार करण्यात आलेली लसही प्रभावी ठरेल, असा दावा अनेक फार्मा कंपन्यांनी केला आहे.