नवी दिल्ली : केंद्रसरकारने आज 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये 'रॉकेटरी' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे तर 'एकदा काय झालं' या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. गोदावरी या मराठी चित्रपटानेही पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. या चित्रपटासाठी उत्कृष्ठ दिग्दर्शनाचा पुरस्कार निखील महाजन यांना जाहीर झाला आहे. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं. पुष्पा चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लु अर्जुन याला जाहीर झाला. तसेच आलिया भट्ट यांना गंगूबाई काठियावाडी, तर क्रिती सेनन यांना मीमी चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
एकदा काय झालं चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनीईटीव्ही 'भारत'ला खास प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मला असं वाटतं बाप आणि मुलगा यावर चित्रपट बनवल्यामुळं पालकांच्या जीवनावर याचा चांगला परिणाम होईल. तसंच या चित्रपटामुळे नाती जवळ येऊ लागतील.
मला वाटतं बाप आणि मुलाच्या नात्यावर एक चित्रपट बनवला. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, हे जास्त महत्वाचं आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद झाला - डॉ. सलील कुलकर्णी (दिग्दर्शक)
मराठी चित्रपट बनवल्याचा आनंद :69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गोदावरी चित्रपटानेही बाजी मारली आहे. निखील महाजन यांना गोदावरी चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये निखिल महाजन यांनी दिग्दर्शन केलेल्या'गोदावरी' चित्रपटाला पुरस्कार मिळालेले आहेत. या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मानवी नातेसंबंधातील भावनांवर आधारीत आहे. गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या कुटुंबाची कथा निखिल महाजन आणि प्राजक्ता देशमुख यांनी लिहिली आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक निखिल महाजन यांनी ईटीव्ही 'भारत'शी संवाद साधला.
"मी आताच नागपुरातून मुंबईत आलो. विमानतळावरुन घरी जाण्यासाठी कॅबची वाट बघत असतानाच राष्ट्रीय पुरस्काराची माहिती मिळाली. पुरस्कार जाहीर झाल्याचं समजताच आनंदाचा धक्काच बसला. त्यातून बाहेर येण्यास पाच मिनिटे लागली. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. हा खूप मोठा पुरस्कार आहे. एवढी अपेक्षा मला नव्हती. मराठी चित्रपट उत्कृष्ट असतात, हे या पुरस्काराने सिद्ध झालं. त्यामुळे अधिक चांगला मराठी चित्रपट बनवल्याचा आनंद आहे."- निखील महाजन (दिग्दर्शक)
एकदा काय झालं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट :चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली. यामध्ये २०२१ सालात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकण्याची इच्छा प्रत्येक दिग्दर्शकाची असते. सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याने मराठी चित्रपट प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री यांसारख्या अनुभवी कलाकारांनी अभिनय केला आहे.
पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांची यादी :
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- सरदार उधम
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा-एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट –कलकोक्खो