हैदराबाद -पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2021 रोजीनोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पैसे काढण्यासाठी लोकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या होत्या. रस्त्यावरुन महामार्गापर्यंत प्रत्येक एटीएमवर लोकांच्या रांगा दिसत होत्या. नोटाबंदीच्या काळात तुम्हाला एटीएमचं महत्त्व समजलं असेल. आज एटीएम दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. 'आटोमॅटिक टेल्लर मशीन' म्हणजेच एटीएमला आज 24 वर्षे पूर्ण होतायत.
जगातील पहिले एटीएम सोन्याचे बनवले आहे. जगातील पहिले एटीएम बार्कलेज बँकेने उत्तर लंडनमधील एन्फिल्ड टाऊनमधल्या शाखेत 27 जून 1967 रोजी पहिलं एटीएम मशीन बसवलं होतं. आज तुम्ही अगदीसहजपणे एटीएममधून पैसे काढू शकता. मात्र, सुरवातीला मशीनमधून निघणाऱ्या नोटा पाहून लोक आश्चर्यचकित होत. जगातील पहिल्या-वहिल्या एटीएममधून पैसे काढणारा ब्रिटिश अभिनेता रेग वार्णे हा पहिला व्यक्ती होता. त्या वेळी त्यांचा "ऑन द बसेस' हा कॉमेडी शो प्रसिद्धीच्या शिखरावर होता. गेल्या पाच दशकात एटीएमचे जाळे जगभर पसरले आहे.
ब्रिटिश अभिनेता रेग वर्णय लंडनमधील एन्फिल्ड टाऊनमधल्या शाखेत असलेले पहिले एटिएम आता बदलले आहे. 2017 मध्ये एटीएमला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर एटीएमला सुवर्णझळाळी देण्यासोबत एटीएमबाहेर सोनेरी फलकही लावण्यात आला होता. गेल्या पाच दशकात एटीएममध्ये अनेक बदल केले असून ते आणखी अद्यावत करण्याचा प्रयत्न सुरूच आहे.
एटीएमचे भारतीय कनेक्शन
जॉन शेफर्ड बॅरन, हे त्या व्यक्तीचे नाव आहे. ज्यांच्या कल्पनेतून मशीनमधून नोटा येऊ लागल्या. जॉन शेफर्ड बॅरन यांचा जन्म 23 जून 1925 रोजी मेघालयाची राजधानी शिलाँग येथे झाला. त्यावेळी त्यांचे वडील चिटगांव बंदर आयुक्तालयात मुख्य अभियंता पदावर होते. 15 मे 2010 रोजी जॉन शेफर्ड बॅरन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी ब्रिटनमध्ये निधन झाले.
असे म्हटलं जात, की एकदा जॉन शेफर्ड यांना पैशांची गरज होती. तेव्हा ते बँकेत पोहोचले. मात्र, एक मिनिटांचा उशीर झाल्याने बँक बंद झाली होती. त्यामुळे त्यांना पैसे काढता आले नाहीत. मग त्यांनी विचार केला, की जर मशीनमधून चॉकलेट बाहेर येऊ शकते. तर मशीनमधून पैसे का बाहेर येऊ शकत नाहीत. असे झाल्यास हे लोकांसाठी खूप सोयीचे असेल. त्याच्या या विचाराचाच परिणाम आटोमॅटिक टेल्लर मशीन म्हणजेच एटीएम आहे.
भारतातील पहिले एटीएम
भारतातील कोणत्या बँकेत देशातील पहिले एटीएम होते? या प्रश्नावर बहुतेक लोक स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव घेतील. पण भारतातील पहिले एटीएम 1987 साली सुरू करण्यात आले होते. हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनने (एचएसबीसी) मुंबईच्या शाखेत एटीएम बसवला होता. त्यानंतर देशभरात एटीएमचे जाळे पसरले. आरबीआयच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 पर्यंत देशात 2,34,244 मशीन्स बसविण्यात आल्या आहेत.
एटीएमचा पिनकोड हा चार अंकीच का?
आपण एटीएमवर जातो. डेबिट कार्ड स्वाइप करतो आणि मशीनवर चार-अंकी पिन टाकून पैसे काढतो. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का एटिएमचा पिनकोड हा चार अंकीच का असतो. जॉन शेफर्ड यांची प्रथम 6-अंकी संकेतशब्द किंवा पिन ठेवण्याची इच्छा होती. परंतु आपल्या पत्नीमुळे, ते तसे करू शकले नाहीत. वास्तविक त्याच्या पत्नीला 6 अंकी संकेतशब्द लक्षात ठेवण्यात अडचण होती. त्या जास्तीत जास्त 4 अंकी संकेतशब्द लक्षात ठेवू शकत होत्या. त्यांच्या पत्नीने सुचवले की 6 अंकांऐवजी 4 अंकी पिन असल्यास लोकांना सोपे जाईल. त्यानंतर 4-अंकी पिनवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आणि आजही क्रमांकित बँकांना वगळता बहुतेक एटीएम पिन फक्त 4 अंकी आहेत.
एटीएमबद्दलची रोचक तथ्य -
- जगातील सर्वात उंचीवर असलेले एटीएम पाकिस्तानच्या नॅशनल बँकच्या नथू-ला येथे आहे. पाकिस्तान-चीन सीमेवर सुमारे 16 हजार फूट उंचीवर आहे.
- भारतात सर्वांत उंचीवर असलेले एटीएम युनियन बँक ऑफ इंडियाचे आहे. हे एटीएम सिक्किमच्या नाथुलामध्ये 14000 फूटांपेक्षा जास्त उंचीवर आहे.
- केरळच्या कोची येथे फ्लोटिंग एटीएम बसविण्यात आले. ही मशीन स्टेट बँक ऑफ इंडियाने बसविली होती. केरळ शिपिंग आणि इनलँड नॅव्हिगेशन कॉर्पोरेशन कंपनीच्या मालकीचे हे एटीएम आहे.
- एटीएममधून केवळ पैसाच नाही, तर सोनेही मिळते. अबू धाबीमधील एका हॉटेलमध्ये गोल्ड-प्लेट निघणारे एटीएम आहे.
- एटीएम सुविधा देणारी आयएनएस विक्रमादित्य ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. येथे एसबीआयचे एटीएम उपग्रहाद्वारे संचलित होते.
- अंटार्क्टिकामध्ये फक्त दोन एटीएम मशीन्स आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत तिथे फक्त एक मशीन होते.
- एटीएमचे तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की आता संकेतशब्दाऐवजी बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट देखील वापरता येतो.
- एटीएमला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. यूके आणि न्यूझीलंडमध्ये त्यास 'कॅश पॉइंट' किंवा 'कॅश मशीन' असे म्हणतात. तर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये त्याला 'मनी मशीन' म्हटले जाते.