दिल्ली - चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. गुरूवारी सकाळी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्याची घोषणा केली.
चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. याआधी दादासाहेब फाळके पुरस्काराने अमिताभ बच्चन, गुलजार, भूपेन हजारिका, मनोज कुमार, श्याम बेनेगल, मन्ना डे, लता मंगेशकर, देव आनंद यांना गौरवण्यात आले आहे.
रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.गेली 30 वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. अशा शब्दात जावडेकर यांनी गौरवोद्गार काढले. आशा भोसले, सुभाष घई, शंकर महादेवन यांच्यासह पाच सदस्यांच्या समितीने एकमताने अभिनेता रजनीकांत यांच्या नावाची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी शिफारस केली होती. येत्या ३ मेला राष्ट्रीय पुरस्कारासोबत हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कंडक्टर ते साऊथ सुपरस्टारपर्यंतचा प्रवास..
अभिनेता रजनीकांतचा कंडक्चिटर ते साऊथ सुपरस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय आणि रोमांचकारी आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात नाटकांमधून केली. कन्नड नाटकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर ते तामिळ सिनेमांकडे वळाले. यासाठी रजनीकांत यांना तामिळ भाषेचे धडे घ्यावे लागले. रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमावरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण असते.